Trending News

No trending news found.

Saturday, 20 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पवनराजे हत्याकांडाचा निकाल; काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना – भाजपच्या गळ्यात!!

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागला आणि काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना आणि भाजप यांच्या गळ्यात येऊन पडले!! पवनराजेंची हत्या झाली 2006 मध्ये. त्यावेळी महाराष्ट्रात राज्य होते

नाशिक : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागला आणि काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना आणि भाजप यांच्या गळ्यात येऊन पडले!! पवनराजेंची हत्या झाली 2006 मध्ये. त्यावेळी महाराष्ट्रात राज्य होते, काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे. पोलीस तपासात हलगर्जीपणा झाला त्याचवेळी. न्यायालयाने पोलिसांवर ठपका ठेवला 2026 मध्ये भाजप महायुतीच्या कारकिर्दीत!!

– मूळ वैर चुलत भावांचे

मूळात पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे एकमेकांचे चुलत भाऊ. म्हणजे त्यांच्या घरातलेच मूळचे राजकारण हे त्यांच्या वैराचे कारण बनले. त्यावेळी सगळे घराणेच काँग्रेसचे होते. काँग्रेस अखंड होती. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना सुरू झाली नव्हती. पद्मसिंह पाटील पहिल्यापासून शरद पवारांचे समर्थक. त्यामुळे पवारांनी नेहमीच पद्मसिंह पाटलांना महत्त्वाची पदे दिली. पद्मसिंह राज्याच्या राजकारणात काम करत राहिले. त्याचवेळी पवनराजे निंबाळकर यांनी धाराशिवचे स्थानिक राजकारण सांभाळले. तेरणा साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर दोघांमध्ये अविश्वासाची आणि भांडणाची ठिणगी पडली. टप्प्याटप्प्याने या दोन्ही नेत्यांचे वय आणि वैर वाढत गेले. ते एकमेकांविरुद्ध विधानसभेची निवडणूक सुद्धा लढले. पण शेवटी दोन्ही भावांच्या वैराची परिणीती पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येत झाली. पण दोघांचीही मूळ राजकीय पार्श्वभूमी काँग्रेसचीच होती. हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात गेल्यानंतर पवनराजेंनी काही काळ अपक्ष म्हणून काम केले पण नंतर शिवसेनेची कास धरली. पवनराजेंमुळे शिवसेनेला त्यावेळच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आणि सध्याच्या धाराशिव जिल्ह्यात पाय रोवता आले. नंतर पवनराजेंच्या मुलाने म्हणजेच ओमराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटील आणि त्यांचा मुलगा राणा जगजीत सिंह या दोघांचाही लोकसभा आणि विधानसभेला पराभव केला. त्यामुळे दोन्ही कुटुंबातल्या राजकीय वैराला वेगळी राजकीय फोडणी मिळत राहिली.

– पद्मसिंह पाटलांचा उदय आणि अस्त

याच दरम्यानच्या काळात पद्मसिंह पाटलांचा राजकीय उदय आणि अस्त झाला. पद्मसिंह पाटलांच्या नावाची चर्चा थेट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीपर्यंत गेली. त्यांच्या संभाव्य केंद्रीय मंत्री पदाची सुद्धा खूप चर्चा करण्यात आली पण यापैकी कुठलीही पदे त्यांना मिळू शकली नाही. गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री इथपर्यंतच पद्मसिहांची मजल पोहोचू शकली. पण हे सगळे ते काँग्रेसमध्ये आणि शरद पवार यांच्याबरोबर असताना घडले.



– पुढची पिढी शिवसेना – भाजपमध्ये

2014 नंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणाने पूर्णच कूस बदलली. काँग्रेसी राजकारण लयाला गेले. एरवी शरद पवार आणि काँग्रेसचे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात वजीर म्हणून वावरत होते त्यांची प्यादी बनली. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या रूपाने नवे वजीर महाराष्ट्राच्या राजकारणात आले. ओमराजे निंबाळकर यांनी नेहमीच शिवसेनेतून आपले राजकारण पुढे रेटले. याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणाचे नवे पर्व लक्षात घेऊन राणा जगजीत सिंह पाटलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोडून देऊन भाजपची कास धरली. त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवून भाजपचे आमदार होणे पसंत केले.

– शिवसेना – भाजपच्या नेत्यांवर वैर निस्तरायची वेळ

नुकत्याच झालेल्या ऑपरेशन कमळ मध्ये ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या जवळ आले. त्यामुळे राणा जगजीत सिंह भाजपचे आमदार आणि ओमराजे निंबाळकर शिवसेनेचे खासदार म्हणून राजकारणात स्थिरावले असतानाच आजचा पवनराजे हत्याकांडाचा निकाल आला. आधी काँग्रेसमध्ये राहून नंतर राष्ट्रवादीमध्ये राहून राजकीय वैर साधणारी दोन कुटुंबे नव्या पक्षातून एकमेकांशी लढू लागली. काँग्रेस मधले सगळे नेते अस्तंगत झाले. पद्मसिंह पाटलांचे स्वतःचे करिअर संपले. पण दोन्ही कुटुंबांमध्ये राजकीय वैर तसेच पुढे चालू राहिले. पवनराजेंची हत्या झाली, त्यावेळी भाजप महाराष्ट्राच्या राजकारणात खिजगणतीतही नव्हता. शिवसेना मुख्य विरोधी पक्ष होती. काँग्रेस सत्तेच्या आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी होती. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातले घरगुती वैर काँग्रेसी राजकारणातून उद्भवले होते. पण आता तेच वैर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांचा भाजप यांना वेगळ्या पद्धतीने हाताळून ते झेंगट निस्तरायची वेळ आली.

– हलगर्जीपणा काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत

म्हणून तर पवनराजे हत्याकांडाचा निकाल आल्याबरोबर एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातच अमित शाहांच्या बरोबर चर्चा केली आणि सीबीआयला उच्च न्यायालयात अपील करण्याचे निर्देश द्यायला लावले. काँग्रेसच्या काळात पोलीस तपासात घडलेल्या हलगर्जीपणाचा ठपका भाजपच्या कारकिर्दीतल्या पोलिसांना सहन करावा लागला. पवनराजेंची हत्या झाली 2006 मध्ये त्यावेळी महाराष्ट्रात राज्य होते, काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे. पोलीस तपासात हलगर्जीपणा झाला त्यावेळी!! न्यायालयाने ठपका ठेवला 2026 मध्ये भाजप महायुतीच्या कारकीर्दीत!! दीर्घकाळ चाललेल्या खटल्याचे फलित असे मिळाले!!

Pawan Raje nimbalkar murder case political repercations

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment