विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sandeep Deshpande मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे. पांढऱ्या पट्ट्या रंगवण्याऐवजी झाडे लावून परिसर थंड ठेवावा, असा सल्ला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मांडताना त्यांनी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनाही उपरोधिक टोला लगावला. दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी आज संदीप देशपांडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोघांनीही पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली.Sandeep Deshpande
“पट्ट्यांऐवजी झाडं लावा, जैन मुनींनाही फायदा होईल”
पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, जैन मुनींना उन्हामुळे त्रास होऊ नये याची काळजी आम्हालाही आहे. मात्र त्यासाठी सार्वजनिक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या रंगवणे हा उपाय योग्य नाही. “जैन समाजाने पांढऱ्या पट्ट्या काढण्याऐवजी झाडे लावावीत. त्या झाडांच्या सावलीतून जैन मुनी चालू शकतील. त्यामुळे वातावरण थंड राहील, पर्यावरणाचेही संरक्षण होईल आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत,” असे देशपांडे म्हणाले.Sandeep Deshpande
हिरव्या रंगावरून नितेश राणेंना चिमटा
झाडे लावण्याचा प्रस्ताव मांडताना संदीप देशपांडे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावरही उपरोधिक टिप्पणी केली. “झाडं हिरवीच असतात. आता त्या हिरव्या रंगाबद्दल नितेश राणेंना काही आक्षेप असेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
“सीबीआय चौकशी कशाला? रॉ किंवा एनआयएकडे द्या”
या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काही जैन समाजाच्या प्रतिनिधींनी केली होती. त्यावरही संदीप देशपांडे यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. “सीबीआयच का? मग रॉ किंवा एनआयएकडेही चौकशी द्या,” असा टोला त्यांनी लगावला. सार्वजनिक मालमत्तेवर अशा प्रकारे रंगकाम करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी रस्त्यांचे विद्रूपीकरण थांबवण्याची मागणी केली. “ज्या सोसायट्यांमध्ये जैन समाज राहतो, त्यांनी तेथे झाडे लावावीत. त्याला कोणाचाही विरोध असणार नाही,” असेही ते म्हणाले.
“आधी पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा”
गिरगावातील पांढऱ्या पट्ट्यांवर स्प्रे मारणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर देशपांडे यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केला. “आमच्यावर गुन्हा दाखल झाला याची चिंता नाही. पण आधी सार्वजनिक रस्त्यावर परवानगीशिवाय पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको”
पांढऱ्या पट्ट्यांमागे सूक्ष्मजीवांचे संरक्षण हा उद्देश असल्याचा दावा केला जात असल्याबाबतही देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केले. “जर सूक्ष्म जीव मारले जाऊ नयेत म्हणून हा आग्रह असेल, तर कोविड काळात लस घेतली की नाही? त्यातूनही जीवाणू नष्ट झालेच ना? घरात डास आले तर त्यांना मारतात की चावू देतात?” असे सवाल त्यांनी केले. तसेच प्रत्येकाने आपला धर्म पाळावा, मात्र तो इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रसाद वेदपाठक म्हणाले, “मनसेनेच पहिला पाठिंबा दिला”
यावेळी प्रसाद वेदपाठक यांनीही आपली भूमिका मांडली. सुरुवातीला हा विषय स्थानिक नागरिकांच्या हक्कांशी संबंधित असल्याचे सांगत त्यांनी हा वाद धार्मिक नसल्याचे स्पष्ट केले. “आम्ही अनेक वर्षांपासून येथे राहत आहोत. आतापर्यंत वातावरण अतिशय खेळीमेळीचे होते. या विषयावर मी पोलिसांकडे पत्रव्यवहारही केला आहे. मात्र सध्या माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आहे,” असे वेदपाठक म्हणाले.
मनसेने सुरुवातीपासून आपल्याला पाठिंबा दिल्याचे सांगत त्यांनी पक्षाचे आभार मानले. “या प्रकरणात सर्वप्रथम मनसे माझ्या पाठीशी उभी राहिली. इतरांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. आता सोशल मीडियावर मला लक्ष्य केले जात आहे, ट्रोलिंग होत आहे आणि काही लोक माझ्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत,” असा दावाही त्यांनी केला.
“Plant Trees Instead of White Lines”: MNS Leader Sandeep Deshpande’s New Proposal to Jain Community
महत्वाच्या बातम्या
- io Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली
- Patna Coaching Row : रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला
- RSS : नोंदणीच्या राजकीय वादात आयकर विभागाने आणि न्यायालयाने कोणते निर्णय दिले होते??; वाचा सविस्तर!!
- महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन नियोजनावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी आणखी एक पाऊल!!



Post Your Comment