
नाशिक : आजोबांचा नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला!!, हेच राजकीय चित्र आज दिल्लीतून समोर आले. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारी विषयी गेले काही दिवस चर्चा सुरू असताना आज अचानक दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा पवार गटाने पुढे आणली. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची कल्पना सुनील तटकरे यांना दिली होती. 16 जानेवारीच्या बैठकीला तर सुनील तटकरे सुप्रिया सुळे हे अजित पवारांबरोबर उपस्थित होते, असे पुरावे सुद्धा त्या गटाने पुढे आणले. मराठी माध्यमांनी अत्यंत उत्साहाने 16 जानेवारीच्या बैठकीच्या बातम्या चालविल्या.
– रोहित पवारांनी पुढे केले शरद पवारांचे नाव
पण याच दरम्यान रोहित पवारांनी राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारांचे नाव राज्यसभेसाठी पुढे आणले आणि त्याला अजितदादांची इच्छा जोडली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर शरद पवार राजकीय संन्यास घेणार होते. पण अजित पवारांनी त्यांच्याच नावाचा राज्यसभेसाठी आग्रह धरला होता, असा दावा रोहित पवारांनी केला. वास्तविक त्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचे नाव अजित पवारांच्या मनात असल्याचा दावा अमोल कोल्हे यांनी केला होता, पण रोहित पवारांनी शरद पवारांचे नाव पुढे आणून अमोल कोल्हे यांच्या दाव्याला छेद दिला.
– अजित पवारांची इच्छा “जोडली”
पण यानिमित्ताने पवार कुटुंबातले एक वेगळेच राजकारण सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड झाले. आतापर्यंत विलीनीकरणाच्या मुद्द्यावरच अजितदादांची इच्छा “जोडली” गेली होती. गेल्या कित्येक दिवसांमध्ये अजितदादांच्या इच्छेनुसार विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला होता, पण त्यावेळी कुणीही अजित पवारांनी शरद पवार यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे केले होते, असे म्हटले नव्हते. पण आज मात्र रोहित पवारांनी शरद पवारांच्या नावाला अजित पवारांची इच्छा “जोडली”. याचा अर्थ आजोबांनी नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला लावला असाच काढला पाहिजे.
– पार्थ पवारच्या नावाला काटशह
कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचे नाव पुढे येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाविकास आघाडीला फक्त एक जागा निवडून आणता येईल. त्यांनी तो उमेदवार ठरवावा उरलेले सहा उमेदवार महायुतीचेच निवडून येतील, असे सांगून महाविकास आघाडी पाचर मारून ठेवली. त्यामुळे खरंतर शरद पवारांची गोची झाली. कारण शरद पवारांच्या नावाला काँग्रेसने विरोध सुरू केला. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची देखील परस्पर विरोधी वक्तव्ये आली.
– सुनेच्या पुढे शरणागतीची अपरिहार्यता
या पार्श्वभूमीवर आपल्याला सुरक्षितपणे राज्यसभेत पोहोचायचे असेल, तर सुनेच्या पुढे राजकीय शरणागती पत्करल्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात येतच शरद पवारांनी रोहित पवारांमार्फत दिल्लीतूनच आपल्या स्वतःच्या नावाचे “प्यादे” पुढे सरकविले, असे मानायला वाव आहे. याचा अर्थ आजोबांनी नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला लावला, असा काढल्यास तो गैर म्हणता येणार नाही.
Grandfather’s grandson’s daughter-in-law’s nomination for Rajya Sabha : Sharad pawar
Post Your Comment