Trending News

No trending news found.

Tuesday, 9 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

भारताची आता व्हेनेझुएला कडून इंधन खरेदी; रशियन तेलाला पर्याय शोधण्याची अपरिहार्यता!!

भारत आता व्हेनेझुएला कडून इंधन खरेदी करणार असल्याची बाब आज स्पष्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत दौऱ्यावर आलेल्या व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्षा डेल्सी रॉड्रिगेझ यांचे नवी दिल्लीत स्वागत केले. त्यांच्याशी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या.

नाशिक : भारत आता व्हेनेझुएला कडून इंधन खरेदी करणार असल्याची बाब आज स्पष्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत दौऱ्यावर आलेल्या व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्षा डेल्सी रॉड्रिगेझ यांचे नवी दिल्लीत स्वागत केले. त्यांच्याशी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या आजच्या शिखर बैठकीचे “पॉलिटिकल टायमिंग” बरेच काही वेगळे सांगून गेले.

– परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज ‘X’ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेझ यांच्या भेटीचे फोटो शेअर केले. ते म्हणतात, “दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला आणि ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा आणि ऑटोमोबाईल यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधल्या. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि ‘ग्लोबल साउथ’च्या (विकसनशील देशांच्या) हितांना पुढे नेण्यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.”

– जगातला तिसरा मोठा इंधनपुरवठादार देश

व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्रालयाचे पूर्व विभागाचे सचिव, रुद्रेंद्र टंडन म्हणाले, “व्हेनेझुएला याच महिन्यात इंधनाचा तिसरा सर्वांत मोठा पुरवठादार म्हणून आधीच उदयास आला आहे, त्यामुळे साहजिकच आजच्या चर्चेचा भर ऊर्जा भागीदारी प्रस्थापित करण्यावर होता. ते भारताला येत्या अनेक वर्षांसाठी एक स्थिर मागणीदार म्हणून पाहतात. त्यामुळे, भारत आणि व्हेनेझुएला यांच्यात ऊर्जा क्षेत्रात, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम या दोन्ही स्तरांवर एकत्र काम करण्यासाठी एक परिपूर्ण पूरकता आहे. आर्थिक भागीदारी इतर क्षेत्रांपर्यंत वाढवण्यावरही चर्चा झाली.”

रुद्रेंद्र टंडन पुढे म्हणाले, “व्हेनेझुएला हा साधनसंपत्तीने समृद्ध देश आहे. येथे केवळ महत्त्वाची खनिजेच नाहीत, तर सोने, हिरे आणि इतर सामग्रीदेखील आहे. त्यामुळे, खाणकाम तिथे मोठ्या प्रमाणावर आहे. खरं तर, त्यांच्याकडे असलेल्या संभाव्य साठ्यांचे मूल्यांकन कसे करायचे, किंवा त्या क्षेत्रात आपण सहकार्य करू शकतो का, यावर चर्चा झाली होती आणि आम्ही हाती घेणार असलेल्या पुढील उपक्रमांचा तो एक महत्त्वाचा भाग आहे.” “ब्रिक्सचा विषय निघाला होता, पण मला आठवतंय त्याप्रमाणे, संभाषणात तो विषय भारताचे आणि पंतप्रधानांच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी अधिक होता.”

– व्हेनेझुएलावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण

परराष्ट्र खात्याच्या या दोन अधिकाऱ्यांनी काहीही सांगितले असले, तरी प्रत्यक्षात भारत आणि व्हेनेझुएला यांच्यात आजच अशा प्रकारची शिखर बैठक होण्याला वेगळे महत्त्व आहे. काहीच महिन्यांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादूरो यांना त्यांच्या देशातून उचलून नेऊन अमेरिकेत ठेवले. त्यानंतर त्या देशातल्या व्यवस्थेवर अमेरिकेचा राजनैतिक प्रभाव निर्माण केला. त्यातूनच डेल्सी रॉड्रिगेझ या व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्ष बनल्या. डेल्सी यांच्या नेतृत्वाखाली व्हेनेझुएलाची सगळी व्यवस्था अमेरिकेच्या नियंत्रणात गेली. त्याचबरोबर व्हेनेझुएलातले सगळे इंधनाचे स्रोत अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आले. व्हेनेझुएला मधील इंधन स्रोतांवर अमेरिकेने पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले.

– रशियन तेलाला पर्याय शोधण्याची अपरिहार्यता

याच दरम्यान अमेरिकेने भारत आणि अन्य देशांवर रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावर निर्बंध लादले ते निर्बंध काही काळासाठी उठविले आणि तेच निर्बंध परत लादण्याची सुद्धा भाषा केली. त्याचवेळी जगात इंधन टंचाई निर्माण झाली. त्यामुळे भारतासह अन्य सगळ्या देशांना पर्यायी इंधन शोधाकडे जावे लागले. यातूनच व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेझ यांचा भारत दौरा “पॉलिटिकल टायमिंग” साधून झाला. त्यांच्या या दौऱ्यात भारताने व्हेनेजुएला बरोबर इंधन खरेदी पासून ते अन्य विषयांपर्यंत विविध करार केले. या सगळ्यातून भारताची निकड भागविली गेली, पण त्याचवेळी अमेरिकेच्या दबावापोटी रशियन तेलाला पर्याय शोधण्याची अपरिहार्यता सुद्धा दिसून आली.

PM Narendra Modi’s meeting with Acting President Delcy Rodríguez of Venezuela today on ‘X’.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment