विशेष प्रतिनिधी
मुंबई : Palghar Highway Accident मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लग्नघरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.Palghar Highway Accident
मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून आयशर ट्रकमधून (MH ४८ DC ७४७४) ३० ते ४० वऱ्हाडी एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. सर्वजण आनंदाच्या वातावरणात प्रवासाचा आनंद घेत असतानाच, सोमवारी सायंकाळी अंदाजे ४ वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील धानीवरी गावाजवळ ही दुर्घटना घडली. भरधाव वऱ्हाड्यांचा ट्रक आणि समोरून येणारा कंटेनर (NL ०१ AC ९११८) यांची अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर आयशर ट्रक आणि कंटेनर दोन्ही वाहने रस्त्यावरच पलटी झाली.Palghar Highway Accident
मृत आणि जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश
या भीषण अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून आत बसलेले वऱ्हाडी खाली चेपले गेले. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये आणि गंभीर जखमी झालेल्यांमध्ये महिला तसेच निष्पाप लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अपघात होताच महामार्गावर आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.
जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांचे पथक युद्धपातळीवर उपचार करत आहे.
अपघातातील मृतांची नावे
सलोनी शिवराम वळवी
अजय अहाडी
सुनील अर्जुन दांडेकर
चिमा गोविंद कुरहाडा
नमिता विठ्ठल दांडेकर
सारिका संतोष लाखात
रियांशी संतोष लाखात
पांडू गणपत लाखात
काळू गोविंद लाखात
सागर नामदेव शेंडे
वंदना शिवराम वळवी
आयुष सिताराम लाखात
सुरेश रत्ना लाखात
भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे अपघात?
या भीषण अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून काही वेळात वाहतूक पूर्ववत केली. हा अपघात नेमका कसा झाला, याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार वाहनाचा भरधाव वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत
या अपघातावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले. ते म्हणाले, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानीवरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. ही घटना ऐकून अतिशय दु:ख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपजिल्हा रुग्णालय कासा तसेच धुंदलवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाशी मी सातत्याने संपर्कात आहे. पोलिस अधीक्षक हे स्वत: घटनास्थळी होते. तेथील बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.
Palghar Highway Accident: 13 Dead, 25 Injured as Engagement Party Truck Collides with Container
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; प्रशासनाच्या बरोबर काम करायची मोठी संधी
- महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना मिळणार विकासाची नवी झळाळी; भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वराचा समावेश!!
- NIA : भारतात घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी पोहोचला, स्लीपर सेल नेटवर्क तयार करण्यासाठी आला होता
- Kamal Haasan : कमल हासन तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना भेटले, 6 मागण्या ठेवल्या; म्हटले – सरकारी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करा



Post Your Comment