नाशिक : 64 आणि 74 वर्षांचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री 35 वर्षांच्या नेत्याच्या घरी; बिहारमध्ये राहुलच्या कर्तृत्वाची वाचा कहाणी खरी!!, असं म्हणायची खरंच वेळ येऊन ठेपली कारण राज्यात तशाच घडामोडी घडल्यात आणि घडत आहेत.
बिहारमध्ये राहुल गांधींनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तब्बल 50 मतदारसंघांमध्ये जाऊन मतदार अधिकार यात्रा काढली. तिथे त्यांनी सुरुवातीला तेजस्वी यादव यांना आपल्याबरोबर घेतले पण ब्रॅण्डिंग मात्र कन्हैया कुमारचे करायचा प्रयत्न केला. तेजस्वी यादव यांनी त्या यात्रेत राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी मते द्या असे साकडे बिहारी जनतेला घातले, पण राहुल गांधींनी काही तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करा, असे म्हटले नाही. त्यामुळे तेजस्वी यादव यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांनी राहुल गांधी दिल्लीला निघून गेल्यानंतर स्वतंत्रपणे मोठी यात्रा काढली. त्या यात्रेत त्यांनी काँग्रेसला सामील करून घेतली नाही. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्वतंत्र यात्रा काढली. त्यांनी तोंडी महागठबंधनची भाषा वापरली. पण काँग्रेसला अपेक्षित असलेल्या जागावाटपात फारसा रस घेतला नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनाच जमिनीवर येणे भाग पडले.
अशोक गेहलोत + भूपेश बघेल तेजस्वी यादवांच्या घरी
आता जमिनीवर आलेले काँग्रेसचे नेते तेजस्वी यादव यांचा उंबरठा झिजवण्यासाठी त्यांच्या घरी आज येणार आहेत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल हे दोन नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह तेजस्वी यादव यांच्या घरी जाणार आहेत. अशोक गेहलोत 74 वर्षांचे आहेत, तर भूपेश बघेल 64 वर्षांचे आहेत दोघांनी राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे बहुमतासह राज्य आणले होते. तिथे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजविली होती. आज तेच दोन वरिष्ठ नेते बिहारमध्ये स्वबळावर कधीही सत्ता न आणू शकलेल्या राष्ट्रीय जनता दल नावाच्या प्रादेशिक पक्षाच्या 35 वर्षांच्या नेत्याच्या म्हणजेच तेजस्वी यादव यांच्या घरी जाणार आहेत. तिथे ते जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला घेऊन जाणार आहेत, जेणेकरून काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळतील आणि महागठबंधन एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ शकेल, असा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
राहुल गांधींच्या कर्तृत्वाचे धिंडवडे
पण या सगळ्या राजकीय घडामोडीतून राहुल गांधींच्या कर्तृत्वाचे मात्र धिंडवडे निघाले आहेत. कारण राहुल गांधींनी बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तिथे जाऊन मोठी यात्रा काढली जणू काही आता बिहारमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आणि तिथे बहुमतासह राजवट येणार, असा आव त्यांनी आणला होता. तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींचा पंतप्रधान म्हणून उल्लेख केला तरी तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणे राहुल गांधींनी टाळले. परंतु, काँग्रेसचे संघटन आणि राहुल गांधींचे कर्तृत्व एवढे तोकडे पडले की शेवटी काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांना म्हणजेच दोन माजी मुख्यमंत्र्यांना तेजस्वी यादव यांच्या नाकदुऱ्या काढण्यासाठी त्यांच्या घरी यावे लागले. कारण तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या आधाराशिवाय काँग्रेसला बिहारमध्ये कुठले राजकीय स्थान मिळणार नाही. दोन – पाच आमदारही निवडून आणता येणार नाहीत याची पक्की जाणीव राहुल गांधींना नसली, तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला झाली म्हणूनच अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांच्यासारख्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना तेजस्वी यादव यांच्या घरचा उंबरठा झिजवण्यासाठी त्यांना त्यांच्या घरी पाठवावे लागले. बिहारच्या काँग्रेसची आणि राहुल गांधींच्या कर्तृत्वाची ही खरी कहाणी आहे.
AICC Senior Observers for Bihar Assembly Polls Ashok Gehlot, Adhir Ranjan Chowdhury and Bhupesh Baghel
Post Your Comment