विशेष प्रतिनिधी
बारामती : Rohit Pawar बारामती पोटनिवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक होत आहे आणि येथून सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच सुनेत्रा पवार निवडून येणार असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केले आहे. भावनिक दृष्टिकोणातून आमचा सुनेत्रा काकींना या निवडणुकीसाठी पाठिंबा आहे. मात्र शेवटी त्या सत्तेत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात त्यांच्या पक्षातील लोकांकडून काही निर्णय घेण्यात आले तर आम्ही त्याचा विरोध करणार, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच 2029 च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार निवडणूक होणार का? यावर देखील त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या प्रेमाखातर लोक मतदान करण्यासाठी येत आहेत. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावर तो उत्साह नाही दिसते की आपल्या नेत्याला निवडून आणायचे आहे. सुनेत्रा काकी यांना खूप चांगले मतदान होणार असे आम्हाला वाटत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढत झाली, विधानसभेतही तसेच झाले आणि आता 2029 च्या निवडणुकीत होईल नाही होईल हा निर्णय दोन्ही पक्षाचा असेल. पण जे लोक अजित पवारांच्या पक्षात आहेत, त्यांना असेच वाटते की पवार vs पवार व्हावे. मात्र शेवटी हा निर्णय दोन्ही पक्षाचा असणार आहे. असे असले तरी 2029 साली पवार विरुद्ध पवार होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले आहे.Rohit Pawar
बारामतीकरांची इच्छा तीच आमची इच्छा
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, काल संसदेत जो काही तमाशा भाजपकडून करण्यात आला. खासदार वाढवण्याचा लपूनछपून प्रयत्न केला गेला आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. आणि आज अजितदादांचा पक्ष असेल, भाजप असेल आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल यांनी त्या बाजूने मतदान केले आहे. या निवडणुकीकडे पाहिले तर बारामतीकरांची जी भावना होती सुनेत्रा काकींना निवडून आणायचे आहे. बारामतीकरांची इच्छा तीच आमची इच्छा आहे. संध्याकाळी 5 नंतर उद्यापासून तुम्ही बघाल जी कोणी व्यक्ती चुकेल, महाराष्ट्राच्या हिताचे कोणी निर्णय घेणार नाही, महाराष्ट्राचे नुकसान जर काही लोकांकडून झाले, या पक्षातून नाहीतर त्या पक्षातून, याचा विरोध जर कोणी करेल तर तो मी असेल.
सुनेत्रा पवारांना पण विरोध करणार का?
सुनेत्रा पवारांना पण विरोध करणार का? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, सुनेत्रा काकींचा विरोध व्यक्तिशः नाही. त्या मंत्री आहेत आणि त्या या सत्तेत आहेत आणि सत्तेत असताना त्यांच्या पक्षाकडून किंवा त्यांच्याकडे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटकडून चुकीचा निर्णय घेतला तर आम्ही सोडणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.
व्ही.के. सिंगला वाचवण्याचे प्रयत्न
रोहित पवार म्हणाले, एक आहे भावनिक दृष्टिकोणातून निवडणूक लढणे, पण राजकारण समजून घेणे पण तितकेच महत्त्वाचे आहे. काही राजकीय लोक आपल्याला काही सांगू शकतात, पण वस्तुस्थिती काय आहे हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. त्यामुळे पुढच्या दोन आठवड्यात जर एएआयबीने रिपोर्ट दिला, फायनल रिपोर्ट जर दिला, तो जो काय ब्लॅक बॉक्स आहे, त्याचा जर रिपोर्ट दिला तर मी स्वतः केंद्रीय एव्हिएशन मंत्र्यांना भेटून सत्कार करेल. पण मला माहीत आहे फायनल रिपोर्ट काही येणार नाही, कारण व्ही.के. सिंगला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे.
भारताचे जहाज इराणकडून ताब्यात; रोहित पवारांची टीका
दरम्यान, रोहित पवारांनी भारताच्या परराष्ट्र धोरणांवरही ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, भारताचा मित्रदेश म्हणून ज्यांची कायम ओळख आहे आणि ज्या देशांसोबत भारताचे प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत त्या इराणने भारतीय जहाजावर गोळीबार करणं असो किंवा आता भारताकडे निघालेली दोन जहाजे ताब्यात घेण्याचा विषय असो, हे भारताच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणाचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली आहे.
पुढे रोहित पवार म्हणाले, स्वातंत्र्यापासून भारताने कायम अलिप्ततावादाचा स्वीकार केला, पण गेल्या दहा-बारा वर्षांपासून देश अमेरिकेच्या बाजूने झुकत चालला असून त्याचा फायदा तर सोडाच पण देशाला कायम तोटा आणि एकावर एक फ्री याप्रमाणे तोट्यासोबतच मानहानीही सहन करावी लागतेय. यामुळं गॅस तुटवड्यासारख्या अनेक अडचणी सामान्य माणसाला सहन कराव्या लागतायेत.
अक्कलशून्य ‘भक्त संप्रदायाला’ केंद्राचा कोणताही निर्णय हा त्यांच्या भाषेत ‘मास्टर स्ट्रोक’ वाटतो… पण आता इराणने ताब्यात घेतलेल्या भारताच्या दोन जहाजांच्या निर्णयालाही ही ‘भक्त मंडळी’ मास्टर स्ट्रोक म्हणतील.. त्यांचं बाजूला ठेवू पण केंद्र सरकारच्या दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळं इराणचं तर सोडूनच द्या पण आज रोजी भारताचे कोणत्याच शेजारी देशांसोबत सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत आणि ही बाब देशासाठी चांगली नाही, हे मान्य करावंच लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.
Baramati Bypoll 2026: Rohit Pawar Foresees ‘Pawar vs Pawar’ Contest in 2029
महत्वाच्या बातम्या
- बारामतीत विक्रमी मताधिक्क्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला कलगीतुरा!!
- राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा ममतांना पाठिंबा!!
- बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशीच तीन पवारांच्या तोंडी तीन वेगवेगळ्या भाषा; राजकीय मतभेदांना फुटल्या वाटा!!
- अजित पवारांचा घातपात ते बारामतीत पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!



Post Your Comment